जळगाव : महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळात नवप्रकाश योजनेत चार कोटी १६ रूपयांची थकबाकी जमा झाली आहे़ घरगुती तसेच औद्योगिक ग्राहकांचा या योजनेला प्रतिसाद मिळत असून कृषीपंपधारक शेतकºयांनी याकडे सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र आहे़ एप्रिलपर्यंत मुदत असलेल्या या योजनेला आता जुलै २०१७ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे़ त्यामुळे थकबाकी वसुलीची आकडेवारी वाढेल, अशी अपेक्षा महावितरण कंपनीकडून व्यक्त होत आहे़महावितरणच्यावतीने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना नवप्रकाश योजनेच्या माध्यमातून तो पुन्हा जोडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रारंभी अभय योजना या नावाने सुरू झालेल्या या योजनेचे नामकरण नंतर नवप्रकाश योजना असे करण्यात आले. घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक या प्रकारातील एकूण ३ लाख ४२ हजार २९४ ग्राहकांकडे ११५ कोटी ९७ लाख वीज बिलाची थकबाकी आहे. यापैकी ७ हजार ३६ ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभाग नोंदविला़ त्यातून महावितरण कंपनीकडे ४ कोटी १६ लाख ५५ हजार रुपये थकबाकी जमा झाली आहे. आता जुलैपर्यंत योजनेला मुदतवाढ१ नोव्हेंबर २०१६ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान नवप्रकाश योजनेची मुदत होती. मात्र २७ सायंकाळी महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून योजनेला मे ते जुलै २०१७ पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे परिपत्रक जारी झाले़ त्यानुसार आता एप्रिलपर्यंत थकबाकीचा भरणा करणाºया ग्राहकाला १०० व्याज व दंड माफीचा लाभ मिळणार आहे़ तर एप्रिलनंतर जुलै २०१७ पर्यंत ७५ टक्के व्याज माफ व १०० टक्के दंड माफ होणार आहे़ या योजनेत कृषीपंपधारक तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणातील थकबाकीदारांचाही समावेश करण्यात आला. सार्वजनिक नळ योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. दोन ग्राहकांनी भरले १ कोटी १९ लाख जळगाव परिमंडळातील दोन औद्योगिक ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभाग नोंदवित़ १ कोटी १९ लाख ५८ हजारांचा थकबाकी भरणा केला़ यात पाचोरा येथील मानसिंगका इंडस्ट्रीजने ५७ लाख ५३ हजार ५९० रुपयांचा भरणा केला़ त्यांना मुळ थकबाकीत १० लाख १५ हजार ५१७ रुपये इतक्या रक्कमेचा फायदा झाला. तसेच नंदुरबार मंडळातील सातपुडा-तापी परिसर सहकारी साखर कारखाना या ग्राहकाने ६२ लाख ५ हजार १२४ रुपये भरले.कोणताही अर्ज करण्याची गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. ग्राहकांनी सुविधा केंद्रात, मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १८००-२००-३४३५ व १८००-२३३-३४३५ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. थकबाकीची देयक भरणा पावतीच नाहरकत प्रमाणपत्र समजण्यात येईल. जोडणीकरिता सुरक्षा ठेव, जोडणी सेवा दर, पुनर्जोडणी दर यातून सूट मिळेल. सुरक्षा ठेव पुढील आर्थिक वर्षात वीजवापरानुसार आकारण्यात येईल. ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़
नवप्रकाशमधून चार कोटींची थकबाकी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 1:02 AM