जळगाव : ‘अपेडा’च्या मदतीने जिल्ह्यातून केळी निर्यातीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत कृषी विभागाने किमान १० शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करून त्यांना एकाच ठिकाणी व एकाचवेळी सर्व मंजुरी देण्याचे आदेश दिले.केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गत कृषी निर्यात धोरणांतर्गत वेगवेगळ्या पिकांचे समूह निर्मिती करून निर्यात धोरण विकसित करण्याची कार्यवाही सुरू आहे. केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा यात समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अपेडाचे सहायक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे यांची जळगाव जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यांच्या उपस्थितीत व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.त्यास जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, केळी संशोधन प्रमुख डॉ.शेख, जैन इरिगेशनचे डॉ.के.बी. पाटील तसेच कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद व पालचे शास्त्रज्ञ, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, तसेच केळी उत्पादक, निर्यातदार, श्ोतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रक्रिया उद्योगांचे संचालक उपस्थित होते.जिल्ह्यातील केळीस भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. तसेच उच्च दर्जाचे केळी उत्पादन येथे घेतले जाते.मात्र या तुलनेत निर्यात फार कमी असल्याने निर्यातीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी यांनी विशेष पुढाकार घ्यावा. त्यांना शासनामार्फत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.चीन, युरोप, रशिया, युएई व इतर देशांमध्ये निर्यातीस चांगली संधी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
केळी निर्यातीसाठी स्थापणार १० शेतकरी उत्पादक कंपन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:06 PM