लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरविली असून, दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढता आहे. त्यामुळे खान्देशातील ४ लाख ग्राहकांकडे १३०० कोटींच्या वर थकबाकी झाली आहे. या थकबाकीमुळे महावितरणला चांगलाच आर्थिक फटका बसत असून, वसुलीसाठी अधिकाऱ्यांनी जोरदार वसुली मोहिम राबविली आहे.
कोरोनामुळे शासनाच्या सुचनेनुसार महावितरणने ग्राहकांचे घरोघरी जाऊन रिडींग न घेता, मार्च ते जून हे तीन महिने सरासरी बिले दिली. मात्र, महावितरणने दिलेली बिले अवाजवी असल्याचे सांगत, अनेक ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी करुन बिलाचा भरणा करण्यास विरोध दर्शविला. ग्राहकांच्या वीजबिलाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत असल्याने, महावितरण प्रशासनाने जळगाव परिमंडळात सर्वत्र तक्रार निवारण शिबिरे घेतली. यामध्ये अनेक ग्राहकांच्या वीजबिलाबाबत तक्रारींचे निवारण करण्यात आले. मात्र, तरीदेखील अनेक ग्राहकांनी अद्यापही वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे.
परिणामी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात थकबाकीचा आकडा तब्बल १३०० कोटींच्या वर जाऊन पोहचला आहे. ही थकबाकी वसुल करण्याबाबत महावितरण प्रशासनाने गेल्या महिन्यापासून जोरदार वसुली मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत तब्बल १३०० ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, १ हजार ४६० ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
इन्फो :
सर्वाधिक थकबाकीत व्यावसायिक नंबर एक
जळगाव परिमंडळात व्यावसायिक ग्राहक सर्वाधिक थकबाकीदार आढळून आले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यात २९ हजार २६६ ग्राहकांकडे २९ कोटींची थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात १४ हजार १५९ व्यावसायिकांकडे १५ कोटी ४३. लाखांची थकबाकी आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात ६ हजार ७६६ ग्राहकांकडे ७ कोटी १४ लाखांची थकबाकी
आहे.
घरगुती ग्राहक : ७ लाख १६ हजार १६०
थकबाकी : २६५ कोटी १८ लाख
व्यावसायिक : ५० हजार १९१ ग्राहक
थकबाकी : ५१ कोटी ६६ लाख
औद्योगिक : ११ हजार २९
थकबाकी : ६५ लाख ८५ हजार
इन्फो :
सर्वाधिक थकबाकी जळगाव जिल्ह्यात
-सर्वाधिक थकबाकीदार ग्राहक जळगाव जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यातील ४ लाख ५४ हजार ७९ ग्राहकांकडे तब्बल ६६० कोटी ७८ लाखांची थकबाकी जमा झाली आहे. यात घरगुती ४ लाख १० हजार ४४८ ग्राहकांकडे १४६ कोटी ४९ लाखांची थकबाकी झाली आहे.
- तसेच जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची २ हजार ३९१ ग्राहकांकडे १९७ कोटी ५८ लाखांची थकबाकी आहे. महावितरणतर्फे या सर्व ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
इन्फो :
मुदतीत थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.अनेकांनी एप्रिल महिन्यापासून वीजबिल भरले नसल्यामुळे, या ग्राहकांनी आता तात्काळ बिल भरणे आवश्यक आहे. पैशांची अडचणी असेल, तर हफ्त्यानेही ग्राहकांना बिले भरता येतील.
फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण, जळगाव