भडगाव : तालुक्यातील वडजी येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत वार्षिक परीक्षण सुरू असताना बँकेचा तत्कालीन व्यवस्थापकाने ६२ लाख ५१ रुपयांचा शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत तत्कालीन व्यवस्थापकाविरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अंकित कैलास अग्रवाल (चार्टर्ड अकौंटंट, रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडजी येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक मनोज प्रभाकर भोसले याने वडजी बँक शाखेत जुलै २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान शाखेतील कापूस अनुदान, संजय गांधी निराधार अनुदान, बोंड अळी अनुदान, तसेच रीबीटच्या रकमा, इतर कर्ज, डिफ्रन्स खाते, ओव्हरड्यूस, एफडी, ब्रांच अॅड्जस्टमेंट खाते व इतर खाते जमा असलेल्या रकमा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या व आपल्या नातेवाईक व परिचितांच्या खात्यात हस्तांतरित केल्या. तसा अपहार तयार करण्याच्या दृष्टीकोनातून चुकीचा हिशेब करून शाखेचा व्यवहारात नोंदी घेतलेल्या आहेत, असे २५ ते २७ आॅगस्ट २०१९ दरम्यान वार्षिक परीक्षणात लक्षात आले. मनोज भोसले याने या काळात एकूण ६२ लाख ५१ रुपयांचा अपहार केला आहे.अंकित अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज प्रभाकर भोसले रा.पाचोरा याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे हे करीत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडजी शाखेत ६२ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:37 PM