- संजय पाटील
जळगाव : एका चारचाकीतून ४० किलो गांजा नेणाऱ्या कासोदा येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीसह एरंडोल येथील तिघांना पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून गांजा , मोटरसायकल व चार चाकी असा साडे दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई चोपडा - धरणगाव रस्त्यावर करण्यात आली.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,एपीआय राकेश परदेशी , हेकाॕ. किशोर पाटील , हेकाॕ. मिलिंद भामरे , हेकाॕ. मधुकर पाटील १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा धरणगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. मोटरसायकलने येणाऱ्या इसमाच्या संशयित हालचालींवरून त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याचे नाव सतीश बापू चौधरी असे सांगितले. त्यामागून चार चाकी वाहन आले. त्याची तपासणी केली असता त्यात ३९ किलो ५०० ग्राम गांजा आढळून आला. यात चालक आकाश रमेश इंगळे (रा.मरीमाता नगर, एरंडोल) व कासोदा येथील शकिल खान अय्युब खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव व तहसीलदार मिलिंद वाघ यांना माहिती दिली, गांजाची किंमत ६ लाख असून ,४ लाखाची चारचाकी व ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे. तपास डिवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत. शकिल खान अय्युब खान हे कासोद्याच्या पंचायत समिती सदस्यांचे पती आहेत.