लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मंगळवारी सायंकाळी पीएम केअर फंडाकडून ४० व्हेंटीलेटर प्राप्त झाले. गुजरात येथील एका मालवाहू गाडीतून हे व्हेंटीलेटर रुग्णालयात दाखल झाले होते. या आधी आठवडाभरापूर्वीच दहा व्हेंटीलेटर रुग्णालयाला प्राप्त झाले होते.
पीएम केअर कडून एकूण ५० व्हेंटीलेटर यंदा येणार होते. त्यापैकी आलेल्या दहा व्हेंटीलेटरचे इन्स्टॉलेशन अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी करून घेतले होते.यातील उर्वरित ४० व्हेंटीलेटर घेऊन ही गाडी मंगळवारी जीएमसीत दाखल झाली होती. साधारण तासाभराची सर्व प्रक्रिया पूर्ण करून डॉक्टरांनी हे व्हेंटीलेटर ताब्यात घेतले. त्यांचे येत्या दोन ते तीन दिवसात इस्टॉलेशन होऊन साधारण आठवडाभरात ते वापरात येतील अशी माहिती आहे. आता एकूण १४४ व्हेंटीलेटर जीएमसीत असून यामुळे गंभीर रुग्णांची फिरफिर थांबणार आहे.
समितीचे नियंत्रण
व्हेंटीलेटर किती आहेत, रुग्णांना किती लावले आहे. आवश्यकता कोणाला आहे. उपलब्ध किती आहेत. या सर्वांचा लेखा जोखा ठेवण्यासाठी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून ही समितीयावर नियंत्रण ठेवत आहे.