जळगाव : जिल्ह्यात ग्रामीण मार्गाचे कामे पूर्ण करुन गेल्या दोन वर्षापासून त्याचा मोबदला मिळालेला नाही. जवळपास ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बिल शासनाने थकविले आहेत. त्यामुळे सर्वच मक्तेदार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. बिले तातडीने द्यावीत यासाठी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या तिन्ही संघटनेच्यावतीने जिल्ह्याभरातील शासकीय कंत्राटदार सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसीय साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तरी देखील बिले अदा झाली नाहीत तर कामे थांबविले जातील, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारांनी जिल्हाभरात ग्रामीण रस्त्यांची कामे केली आहेत. ही कामे पूर्णही झालेली आहेत. दोन वर्षापासून या कामांचे बीले थकली आहेत. प्रत्येक वेळी १० ते १२ टक्के निधी वितरीत होतो. त्यातूनही कंत्राटदारांपर्यंत ३ ते ४ टक्केच निधी पोहचतो. त्यामुळे सर्वच कंत्राटदार अडचणीत आलेले आहेत. बँकाचे व्याज, मशिनरीचे हप्ते, कामगारांचे पगार, बाजारातून उपलब्ध केलेले साहित्याचे देणे व घरगुती खर्च यामुळे कंत्राटदार हवालदिल झाले असून मानसिक तणावात आहेत. या अरिष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी सर्व बीले अदा होणे आवश्यक आहे. साखळी उपोषण केल्यानंतरही बिले निघाली नाहीत तर मग जिल्ह्यातील सर्वच शासकीय कामे थांबविले जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, कार्यकारी अध्यक्ष प्रमोद नेमाडे व सचिव सुनील पाटील यांनी दिला आहे.