लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्षातील १२ महिन्यांपैकी तीन महिनेच खरेदीचा हंगाम असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात यंदा सलग दुसऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे उलाढाल ठप्प झाली आहे. खरेदी-विक्रीच्या या हंगामासाठी व्यावसायिकांनी खरेदी करून ठेवलेला जवळपास ४०० कोटींचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा माल दुकानात तसाच पडून आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही हे संकट ओढावल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला असून, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही त्याची झळ सहन करीत आहे. गेल्या वर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यापासून जून महिन्यापर्यंत दुकाने बंद राहिली होती. नेमका हाच खरेदीचा हंगाम व्यावसायिकांच्या हातून गेला होता. त्यानंतर गणेशोत्सवापासून व्यवसाय हळूहळू सुरळीत होऊ लागले व दसरा-दिवाळीच्या काळात झालेल्या उलाढालीत काहीसा आधार झाला. या सर्वांमुळे दिलासा मिळत असतानाच पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला व नागरिकही काहीसे दुकानांवर जायला घाबरू लागल्याने मार्च महिन्यापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानावर ग्राहक कमी झाली. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ब्रेक द चेन लागू केल्याने ही दुकाने बंदच आहे.
हंगाम तोंडावर असल्याने मोठी खरेदी
जळगाव जिल्ह्यातील तापमान पाहता फेब्रुवारी महिन्यापासूनच येथे उकाडा सुरु होतो. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमध्ये एसी, फ्रीज, कूलर अशा विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली. मार्च-एप्रिल महिन्यात या वस्तूंना चांगलीच मागणी वाढते. त्यादृष्टीने व्यावसायिकांनीही नियोजन केले असले तरी अचानक २५ मार्च निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या व खरेदी केलेला माल तसाच ठेवण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय राहिला नाही. ब्रेक द चेनमुळे दुकाने बंद झाली व व्यावसायिकांना घरी बसण्याची वेळ आली आहे.
दोन आठवड्यांत २०० कोटींची उलाढाल ठप्प
५ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकान बंद आहे. या दोन आठवड्यांच्या काळात शहरातील ६० दुकानांवरील जवळपास २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे व्यावसायिकांचे नुकसान तर होतच आहे शिवाय या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे.
लग्नसराईचा हंगाम हुकला
उन्हाळ्यातील विविध वस्तूंच्या खरेदीसह लग्नामध्ये देण्यासाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन, ओहन, एलईडी अशा विविध वस्तूंची खरेदी देखील केली जाते. मात्र लग्नासाठी होणारी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदीदेखील ठप्प झाली आहे.
-------------------
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसी, कुलर, फ्रीज या वस्तूंसह लग्नसराईसाठी लागणाऱ्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुकानांमध्ये खरेदी करून ठेवल्या. मात्र ऐन खरेदीच्या हंगामात पुन्हा निर्बंध लागल्याने दुकानांमध्ये जवळपास ४०० कोटी रुपयांचा माल पडून आहे. शिवाय गेल्या दोन आठवड्यांत २०० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
- महेंद्र ललवाणी, अध्यक्ष, जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन