जळगाव: मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या ४३ जणांचे नळ कनेक्शन महापालिकेने कापले असून १ मार्चनंतर ही मोहीत अजून तीव्र केली जाणार आहे. दरम्यान, थकबाकीदारांसाठी लागू केलेली अभय योजना आता फक्त दोनच दिवस लागू राहणार आहे. शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीही वसुलीचे कामकाज सुरु ठेवण्यात आले होते. या दोन दिवसात अभय योजनेअंतर्गत २१ लाख ७९ हजार ४९३ रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी केलेला आहे.
महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांसाठी ८ फेब्रुवारीपासून अभय शास्ती योजना लागू करण्यात आली आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत ही योजना लागू आहे. २६ फेब्रुवारी अखेर ६ कोटी ४५ लाख ५१ हजार १७१ रुपयांचा भरणा झाला आहे. ज्या मिळकत धारकांकडे थकबाकी कराचा भरणा बाकी आहे, अशांना मनपाकडून जप्तीचे अधिपत्र बजावणी झाल्यावर सुद्धा थकबाकी कराचा भरणा केलेला नाही अशा ४३ थकबाकी मिळकत धारकांचे नळ कनेक्शन कापण्यात आले आहे. चारही प्रभाग समित्यांमध्ये सोमवारी २८ तर मंगळवारी १५ अशा ४३ थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी १ कोटी ३४ लाख तर २७ रोजी १ कोटी ५ लाख असा एकूण २ कोटी ३९ लाखा लाखाचा भरणा झाला. मालमत्ता करावरील शास्ती माफीच्या योजनेस आता मुदतवाढ दिली जाणार नाही आहे असे मनपातर्फे कळविण्यात आले आहे.
योजनेचा कालावधी संपल्यानंतर थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर मनपा अधिनियम अंतर्गत जप्तीची पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकबाकी कराचा भरणा करावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपाययुक्त (महसूल ) निर्मला गायकवाड (पेखळे ), सहाय्यक आयुक्त (महसूल) गणेश चाटे यांनी केले आहे.