जळगाव : जिल्ह्यातील धरणांमध्ये २३ जूनअखेर ४३ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गिरणा, वाघूर आणि हतनूर या मोठ्या प्रकल्पांमध्ये ३६, तर इतर मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सात टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
जून महिन्याच्या सरासरीपेक्षा आतापर्यंत फक्त ६८ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यात धरणांमधील साठ्यावरदेखील परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरात झालेल्या पावसाचा फायदा गिरणा धरणाला होतो. या धरणात १८.४८ टीएमसी पाणी साठा आहे, तर मध्य प्रदेशात झालेल्या पावसाचा फायदा हा तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाला होतो. त्यामुळे या धरणात ९ टीएमसी पाणी आहे. जिल्ह्यात आणि अजिंठा डोंगररांगांमध्ये आतापर्यंत पुरेसा पाऊस झालेला नसल्याने वाघूर धरणात ८.७७ टीएमसी पाणी आहे. गत वर्षापेक्षा यंदा या धरणांमध्ये २३ जुलैपर्यंतचा हा साठा जास्त आहे.
पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचे आवाहन
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी एवढा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. कमी पाऊस असताना पेरणी केल्यास अपुऱ्या ओलाव्यामुळे पेरणी वाया जाऊ शकते व दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.