जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबत योजना आणली असून, यासाठी महामंडळाच्या जळगाव विभागातून फक्त ४४ कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आहेत. सध्या महामंडळात विविध विभागांमध्ये ५० वर्षांवरील १ हजार २७१ कर्मचारी असताना बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरल्यामुळे या योजनेकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
महामंडळातर्फे गेल्या महिन्यापासून ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्त्यासह प्रत्येक वर्षासाठी १२ ऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. नियमानुसार स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहेत. तसेच मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेतले जात आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.
इन्फो :
...तर योजनेमुळे नुकसान
महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक नुकसान होत असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे महामंडळातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या महामंडळात ५० वय पूर्ण केलेले कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार ५० हजार रुपये पगार घेत आहेत. वर्षाला यातून ६ लाख रुपये उत्पन्न होते. मात्र, जर या स्वेच्छानिवृत्ती योजनुसार निवृत्ती घेतली तर प्रत्येक वर्षासाठी तीन महिन्यांचेच वेतन मिळणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.