स्टार : 729
पोर्टलवर केवळ ९९८ मृतांची नोंद : तर सार्वजनिकरित्या ९५० मृतांची संख्या जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४४० मृत्यू झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून दररोज जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या जाहीर केली जात आहे. सर्वाधिक ९५० मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून पोर्टलवर जाहीर होणाऱ्या मृत्यू व प्रसार माध्यमांसाठी दररोज सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात येणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत आढळून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सार्वजनिकरीत्या जाहीर केलेल्या आकडेवारीत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, पोर्टल वर मात्र ९९८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे ४८ मृतांची आकडेवारी सार्वजनिकरीत्या का जाहीर करण्यात आली नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
जिल्ह्यासह राज्यात देखील कोरोनामुळे मृत होणाऱ्या आकडेवारीत लपवाछपवी होत असल्याचा आरोप होत आहे. जळगाव शहरातील स्मशानभूमीत दररोज अंत्यसंस्कार होणाऱ्यांची संख्या व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून जाहीर होणाऱ्या मृतांच्या संख्येत देखील मोठी तफावत आढळत आहे. त्यात आता पोर्टलवर ९९८ मृत्यूची नोंद व सार्वजनिकरित्या जाहीर होणाऱ्या प्रसिद्धी पत्रकावर ९५० मृतांची संख्या असल्याने ४८ मृत्यू प्रसारमाध्यमांसाठी व सार्वजनिक रित्या का जाहीर केले जात नाही ? असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर देखील प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट होताना दिसून येत नाही. पोर्टलवर जाहीर करण्यात येणारी आकडेवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलच असून संपूर्ण जिल्ह्याच्या आकडेवारीवर देखील मोठी तफावत असण्याची शक्यता आता निर्माण होत आहे.
ही पहा तफावत
शासकीय महाविद्यालयात झालेले मृत्यू -९५०
पोर्टलवर नोंद - ९९८
सर्वाधिक बळी शहरात
जिल्ह्यात एकूण २४४० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे जळगाव शहरात झाले आहेत. जळगाव शहरात एकूण ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्याखालोखाल ३२० जणांचा मृत्यू भुसावळ तालुक्यात झाले आहे.
तर बसू शकतो फटका
१. पोर्टलवर किंवा सार्वजनिकरीत्या जाहीर होणाऱ्या मृतांच्या संख्येत तफावत आढळल्यास किंवा मृत्यूची संख्या लपवली गेल्यास, त्याचा परिणाम कोरोना वरील उपाययोजनांवर होऊ शकतो.
२.मृत्यूची संख्या वाढल्यास राज्य व केंद्र शासनाकडून संबंधित जिल्ह्यात तात्काळ उपाययोजना यासाठी नियोजन करता येऊ शकते, मात्र ही गंभीर परिस्थिती लपवली गेल्यास त्याचा परिणाम अजून गंभीर होण्याची शक्यता निर्माण होते.
३. शहरातील नेरी नाका स्मशान भूमीत दररोज ४० हून अधिक जणांनी वर अंत्यसंस्कार केले जात आहेत.मात्र, प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार त्यात पाच ते सहा रुग्णच कोरोना बाधित असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ही स्मशानभूमी कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आली आहे.
सारीच्या रुग्णांचाही समावेश
- जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असल्याने, प्रशासनाकडून महिनाभरापासून कोरोना मृतांचा संख्या सोबतच सारी मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आता जाहीर केली जात आहे.
- तसेच अनेक रुग्ण हे कोरोना वर मात केल्यानंतर दगावत असल्याने अशा मृतांची संख्या ही कोरोना मृतांमध्ये केली जात नाही.
मनपा वॉररूम
- कोरोना वरील उपाययोजनांसाठी मनपा प्रशासनाने वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त केले आहे.
- अँटिजन टेस्ट, कोरोना सेंटर, घरोघरी जाऊन रुग्णांची नोंदणी व तपासणी करणे, यासह शहरात होणाऱ्या मृत्यूंची संख्या जमा करून वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्याचे काम मनपा प्रशासनाकडून केले जात आहे. यासाठी मनपा प्रशासनाची वॉररूम रात्रंदिवस काम करत आहे.