जळगाव : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. पाठोपाठ आता लवकरच बारावीचा निकालही जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रवेशाचे वेध लागले आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील २१८ महाविद्यालयांमधील ४९ हजार ०८० जागांसाठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, या जागांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना यंदा सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. मंगळवारपासून सीईटी परीक्षेच्या आवेदन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे.
सोमवारी अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, मंगळवार, २० जुलैच्या सकाळी ११.३० वाजेपासून ते २६ जुलैपर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाइन भरायचे आहे.
चांगले गुण मिळविण्यासाठी तयारी करावी लागणार
अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागलेल्या दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्के, १०० टक्के गुण मिळाले. हे मात्र खरे असेली तरी इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दहावीमध्ये चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता सीईटी परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठीची तयारी करावी लागणार आहे.
१०० गुणांची परीक्षा
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे. सीईटी परीक्षा ऐच्छिक आहे. शंभर गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून, ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे.
अकरावी प्रवेशक्षमता
- अनुदानित महाविद्यालय : १४५
- कला : १६,७२०
- विज्ञान : ७,६८०
- वाणिज्य : ३,०४०
- संयुक्त : १,८८०
००००००००००००००००
- विनाअुदानित महाविद्यालय : ५०
प्रवेशक्षमता - कला : ६,५६०
- विज्ञान : ८,१६०
- वाणिज्य : १,९२०
- संयुक्त : ३२०
००००००००००००००
- स्वयं अर्थसाहाय्यित : २३
- कला : १,०४०
- विज्ञान : १,३६०
- वाणिज्य : ४००
००००००००००००००००००
विद्यार्थी लागले अभ्यासाला...
दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी परीक्षा होणार आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थी सुद्धा आता जोमाने अभ्यासाला लागले आहे. परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून पसंतीच्या महाविद्यालयांची निवड केली जात आहे. सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेवेळी प्राध्यान्य दिले जाणार आहे.