लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मनपा महापौर निवडणूकप्रसंगी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला साथ दिली आहे. फुटीर नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप सभागृह नेते ललित कोल्हे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
मनपा महापौर जयश्री महाजन यांनी महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, सभागृह नेते यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ललित कोल्हे यांनी आमदार सुरेश भोळे यांच्यावर टीका करीत, मनपा सत्ताधारी भाजपमधील झालेल्या फुटीला केवळ सुरेश भोळे यांचे गटबाजीचे राजकारण जबाबदार असल्याचा आरोपदेखील कोल्हे यांनी केला. भाजपमध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रवेश केला होता. मात्र, आमदार सुरेश भोळे यांच्यामुळे सर्वांची भाजपात घुसमट होत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांनी कामे देताना भेदभाव केला, कुणाला कामे द्यावी हे अगोदरच ठरलेले असायचे. आम्ही सर्व २७ लोक बाहेर पडलो ते केवळ आमदार सुरेश भोळे यांच्यामुळेच. गेल्या महिन्यातदेखील आमदार भोळेंच्या कार्यालयावर काही नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. भाजपचे नवग्रह मंडळातील नगरसेवकांनी गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या. कुलभूषण पाटील यांच्यासारख्या तरुण नेतृत्वालादेखील आमदार भोळेंकडून दूर सारण्यात आले होते. भाजपामधील अंतर्गत गटबाजीमुळे नगरसेवकांचा असंतोष बाहेर आला आणि भाजपची सत्ता उलथवू देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांची केली दिशाभूल
आमच्या प्रभागासाठी सुमारे चार कोटींचा निधी आणला असताना या निधीतील कामे आमदारांच्या निकटवर्ती नगरसेवकांच्या प्रभागात देण्यात आली. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेदेखील तक्रारी केल्या. मात्र, आमदार सुरेश भोळे यांनी गिरीश महाजन यांचीही दिशाभूल करण्याचे काम केले. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आपण सुरेश भोळे यांच्या विरोधात उमेदवारी केल्याने त्याचा राग त्यांच्या मनात कायम होता, त्यामुळे आमच्या प्रभागातील कामांना ब्रेक लावण्याचे काम सुरू होते, असा आरोप त्यांनी केला.