संजय सोनार
चाळीसगाव, जि. जळगाव : शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना बोरखेडा, ता. चाळीसगाव येथील तलाठी आणि कोतवाल यांना रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी बोरखेडा ग्रामपंचायत कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (५० रा. शिवशक्तीनगर, चाळीसगाव) आणि कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (३७, रा. श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) अशी लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या नावे बोरखेडा बु. येथील शेतजमीन आहे. त्यांच्या हिश्श्यावरील एक गट पत्नीच्या नावे करून द्यावा, यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यासाठी तलाठ्याने नोव्हेंबर-२०२१ मध्ये सात हजार रुपयांची रक्कम घेतली होती. तरीही काम न झाल्यामुळे तक्रारदार हे तलाठ्यास भेटले. यावेळीही तलाठ्याने प्रथम सात हजार रुपये व तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. पाच हजाराची रक्कम घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.