आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी समितीकडून याचे परीक्षण केले जाते. यात ५३३ मृत्यूचे परीक्षण केल्यानंतर यातील २७० रुग्णांना अर्थात ५०.६६ टक्के लोकांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. रविवारी झालेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यू यकृत निकामी झाल्याने झाला असे कारण डॉक्टरांनी नोंदविले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आकडेवारीनुसार ३५४ पुरुष व १७९ महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांमधील ४०४ रुग्णांना विविध व्याधी होत्या, तर १२९ रुग्णांना कसल्याही व्याधी नव्हत्या. मात्र, वय अधिक असणे आणि वेळेवर रुग्णालयात न येणे अशी त्या मागे काही कारणे नोंदविण्यात आली आहेत.
असे आहेत मुत्यू
मधुमेह - ५०.६६ टक्के
रक्तदाब - ३७.७१ टक्के
हृदयरोग - १४.२६ टक्के
किडनी विकार - १०.३२ टक्के
दमा - ४.६९ टक्के
अतिमद्यसेवनाचे सात बळी
मद्यसेवनाने यकृत खराब होऊन कोरोनाची लागण झालेल्या सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या १. ३१ टक्के असून, मद्यपान कोरोनासाठी घातक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
तरुणाचा मृत्यू तज्ज्ञांना काय वाटते?
जळगाव शहरातील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या तरुणाचे यकृत निकामी झाले होते. मुळात तो कोरोना म्हणून नव्हे, तर हेपेटायटीसमुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला दम लागत होता, अन्य लक्षणे नव्हती, त्याची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. यकृतात प्रोटिन्स तयार होतात, यामुळे प्रतिकारक्षमता वाढते, मात्र, हे प्रोटिन्स तयार न झाल्याने प्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय यकृत खराब झाल्याने विषारी पदार्थ मेंदूत जातात व त्याच्यामुळे रुग्णाला दम लागतो. अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली.
तरुणांनाही धोका
कोरोनाची लागण अधिक असेल, विषाणूचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये अधिक झाला असेल तर तरुणाचाही कोरोनात मृत्यू होऊ शकतो, अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यातही समोर आली आहे. यात अन्य व्याधी असलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. नाखले यांनी सांगितले.