लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : नोटीसा व सुचना देऊनही न हटवलेले ५० अतिक्रमणे बुधवारी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमिनदोस्त केली. घाटरोड लगतच्या कुरेशी गल्लीतील जेसीपीच्या सहाय्याने ही मोहिम दिवसभर राबविण्यात आली. शहरातील इतर भागात असणारी अतिक्रमणे देखील काढण्यात येणार असून ही मोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती नगर अभियंता विजय पाटील यांनी दिली.
मध्यंतरी पालिकेतर्फे शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहिम सुरु केली होती. बुधवारी पुन्हा मोहिमेला गती देण्यात आली. घाटरोड लगतच्या कुरेशी गल्लीतील नागरिकांना अतिक्रमणे काढण्याबाबत वेळोवेळी तोंडी सुचना दिल्या गेल्या. पालिकेतर्फे नोटीसाही बजावल्या. मात्र अतिक्रमणे हटविले गेले नाही. अखेरीस मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणे काढली गेली.
सहाय्यक नगररचनाकार नितिन देवरे, प्रेमसिंग राजपूत, भूषण लाटे, संजय राजपूत, तुषार नकवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांचा देखील समावेश होता.
घरांचे अतिक्रमण काढलेघरांसमोरील ओटे, शौचालये, शेड यासह काही प्रमाणात घरांचेही अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. ही मोहिम दिवसभर सुरु होती. सोमवारी पुन्हा याच भागातील इतरही अतिक्रमणे काढण्यात येणार आहे.