सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवसेंदिवस डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे, एसटी महामंडळाने पर्यायी सुविधा म्हणून विजेवर चालणाऱ्या बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळातर्फे प्रत्येक विभागातून या बसेसच्या मागणीबाबत प्रस्ताव मागविण्यात येत असून, जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याबाबत महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या विजेवर चालणाऱ्या बसेसमुळे महामंडळाचा डिझेलवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.
कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटली असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महामंडळाकडे पैसे नाहीत. कोरोनामुळे तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात गेले आहे. त्यात डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढणारे दर आणि अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने हा तोटा कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या प्रत्येक विभागाला या बसेस चालविण्याबाबत अभिप्राय व बसेसची संख्या मागविली असून, जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याची तयारी दर्शविली आहे. चार्जिंग केल्यानंतर, ही बस ३०० किलोमीटरपर्यंत धावणार असून, चार्जिंगसाठी ज्या आगारातर्फे या बसेस चालविल्या जातील, त्या आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
इन्फो :
या मार्गावर धावणार बसेस
जळगाव : चाळीसगाव
जळगाव : पाचोरा
जळगाव : धुळे
जळगाव : रावेर
जळगाव : चोपडा
इन्फो :
आणखी दोन महिने लागणार
महामंडळातर्फे विजेवर चालविणाऱ्या बसेसचा निर्णय घेण्यात आला असून, या बसेस चालविण्याबाबत प्रत्येक विभागातर्फे माहितीदेखील मागविण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव विभागानेही महामंडळाकडे आपला अहवाल पाठविला आहे. सर्व प्रक्रिया होऊन, साधारणत: दोन महिन्यानंतर विजेवर चालणाऱ्या बसेस रस्त्यावर धावणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
आगारांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन
महामंडळाच्या जळगाव विभागाने ५० बसेस चालविण्याची तयारी दाखविली असून, ज्या आगारांना या बसेस चालविण्यासाठी देण्यात येतील. त्या त्या आगारामध्ये चार्जिंग स्टेशन लावण्यात येणार आहेत. जर प्रत्येक आगारांना बसेस दिल्या तर प्रत्येक आगारामध्ये हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
खर्चात होणार बचत
महामंडळाच्या सध्या ताफ्यात असलेल्या सर्व बसेस या डिझेलवर चालणाऱ्या असून, डिझेलसाठी दररोज लाखो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, विजेवर चालणाऱ्या या ५० बसेसमुळे डिझेलची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्नातून येणारा पैसा हा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होणार असून, कर्मचाऱ्यांचीही आर्थिक अडचण दूर होणार आहे.
इन्फो :
महामंडळाने विजेवर चालणाऱ्या बसेस चालविण्याचा निर्णय खूप चांगला आहे. या निर्णयामुळे डिझेलची बचत होऊन प्रदूषण कमी होणार आहे. जळगाव विभागातून ५० बसेस चालविण्यात येणार आहे.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग