लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. परिणामी, मंगळवारी नवीन शैक्षणिक सत्राला ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. दुसरीकडे इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे पन्नास टक्के शिक्षकांची तर इयत्ता दहावी व बारावीचे शंभर टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी द.गो. जगताप यांनी सोमवारी पत्र काढले आहे.
मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत़ नोव्हेंबर महिन्यात शाळांची दारं विद्यार्थ्यांसाठी उघडली गेली; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दोन महिन्यानंतर शाळांची दारं विद्यार्थ्यांसाठी पुन्हा बंद झाली. आता मंगळवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे़ कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम असल्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास शक्य नसल्यामुळे ऑनलाइन शाळांना सुरुवात झाली. दरम्यान, ऑनलाइन शाळा सुरू होण्यापूर्वी सोमवारी शिक्षण उपसंचालकांनी सूचना पत्रक काढले आहे. त्यात इयत्ता पहिली ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे पन्नास टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे़ तर इयत्ता दहावी व बारावीचे शंभर टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती शंभर टक्के अनिवार्य करण्यात आली आहे.
३० जूनपर्यंत पटनोंदणी करावी लागणार
दरम्यान, ३० जूनपर्यंत गटातील सर्व विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून इयत्ता पहिली ते आठवीची मुला-मुलींची १ जुलै रोजी पटसंख्या अहवाल हा जिल्हा परिषदेला सादर करावयाचा आहे. याबाबत शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना वेळोवेळी शाळांना भेटी देण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.
नोंदी अद्ययावत कराव्यात
शिक्षकांनी वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना सर्व लाभ मिळवून द्यावेत, त्यासोबतच शिक्षकांनी शाळा सिद्धी पोर्टलवर ऑनलाइन नोंदी अद्ययावत करण्याच्याही सूचना जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचेही कळविण्यात आले आहे.
वर्गशिक्षकांनी शंभर टक्के पटनोंदणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत पटनोंदणी पूर्ण करून तो अहवाल १ जुलै रोजी सादर करावयाचा आहे.
- सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी
अशा आहेत शाळा
जिल्हा परिषद - १८२८
मनपा शाळा - ३०
नगरपालिका शाळा - ४३
००००००००००००००
असे आहेत शिक्षक
जिल्हा परिषद - ७३८९
मनपा - १८१
नगरपालिका - ३०६