जळगाव/पहूर : जिल्ह्यातील पिंपळगाव गोलाईत ता. जामनेर शिवारातील खोकरमळा जंगलात रविवारी रात्री झालेल्या वादळी पाऊस व गारपीटमुळे जवळपास पाचशे मेंढ्या दगावल्या आहेत. यात तब्बल ८० ते ९० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने सहा धनगर बांधवाचे संसार उघड्यावर आले आहेत.
अवकाळी पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. त्याचप्रमाणे मेंढपाळ आणि पशुपालकांनाही या अवकाळीमुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. भगवान सदाशिव कोळेकर (रा.नांदगाव, जि.नाशिक ) येथील सहा बांधवाचा मेंढरांचा वाडा पिंपळगाव गोलाईत शिवारात उतरला होता. यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वाडावरील मेंढ्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर काही गारपीटीच्या मारामुळे दगावल्या आहेत. घटनास्थळी तालुका प्रशासन अधिकारी व कर्मचारी पोहोचले आहेत.