४८२ दुकाने केली सील : मास्क न वापरणाऱ्या चार हजारांहून अधिक नागरिकांवर दंड ;
मनपाकडून करण्यात आलेली कारवाई
कारवाई - संख्या - वसुली
मास्क न लावणारे - ४,३१८ - १७ लाख ४ हजार ४००
लपून छपून व्यवसाय करणे - ५९६ - ३१ लाख ७९ हजार ५००
वाहनधारक -१९२ - १ लाख ३७ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने शहरभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंध काळातदेखील नागरिकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. निर्बंध काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांकडून मनपा प्रशासनाने तब्बल ५१ लाखांची वसुली केली आहे, तर शहरातील ४८२ दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनपा प्रशासनाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ भागात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उपायुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसह लपून छपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवरदेखील कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच निर्बंध काळात मास्क न लावणाऱ्यांवरदेखील मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने मास्क न लावणाऱ्या ४ हजार ३१८ नागरिकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
५० जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे
निर्बंध काळात लग्न असो वा अंत्यसंस्कार याबाबत जिल्हा प्रशासनाने उपस्थितांची संख्या निर्धारित केली होती.मात्र, शहरातील अनेक ठिकाणे लग्न समारंभामध्ये जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाली होती. याबाबत मनपा प्रशासनाकडून सहा मंगल कार्यालय सील करण्यात आली होती, तर नियम मोडणाऱ्या ५० जणांवर मनपा प्रशासनाने निर्बंध काळात गुन्हेदेखील दाखल केले आहेत. काही ठिकाणी कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व भाजीपाला विक्रेत्यांमध्येदेखील वाद झाल्याने हा वाद खेड पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. या वादा दरम्यानदेखील अनेक भाजीपाला विक्रेत्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले.
४८२ दुकाने झाली सील, ११२ वाहनधारकांवर करण्यात आली कारवाई
कोरोना काळात मनपा प्रशासनाने शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या काळातदेखील अनेक विक्रेत्यांनी लपून छपून व्यवसाय केल्याचे आढळून आले, तर काही दुकानदारांनी आपला दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर ग्राहकांची गर्दी केल्यामुळे मनपा प्रशासनाकडून ५९६ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी ४८२ दुकानदारांची दुकाने सील करण्यात आली. तसेच या काळात नियम मोडणार्या वाहनधारकांवरदेखील कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडूनदेखील एक लाख रुपयांची वसुली करण्यात आली.