दातार लॅबकडून मोठ्या प्रमाणात अहवाल प्राप्त झाले रविवारी आरटीपीसीआरचे २०२९ अहवाल समोर आले. यात १९७ बाधित आढळून आले आहेत तर ॲन्टीजनच्या १११९ चाचण्यांमध्ये ३१४ जण बाधित आढळून आले आहेत. रविवारी जामनेर तालुक्यात ७८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून काही तालुक्यांमध्ये संसर्ग वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शहरातील कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवस संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४६०४ वर पोहोचली असली तरी यात ३५४३ जणांना लक्षणे नाहीत, त्यामुळे ही एक दिलासादायक बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील ३१७४ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढून बरे होणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून आता ९० टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण फेब्रुवारीपर्यंत ९७ टक्क्यांवर होते.
सायंकाळपर्यंत केंद्रांवर गर्दी
कोरोना चाचणी करण्यासाठी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गर्दी झालेली होती. डॉक्टर कर्मचारी यांनी पूर्ण वेळ थांबून नागरिकांची तपासणी करून घेतली. गेल्या काही दिवसांपासून तपासण्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.