अमळनेर जि. जळगाव :
तब्बल सहा तास, बारा माणसे सतत शिक्का मारत होती. तेव्हा कुठे पाडळसरे जनआंदोलन समितीने पाठवलेली दीड क्विंटल वजनाची ५२ हजार ५०० पोस्टकार्ड अमळनेर टपाल कार्यालयातून १० रोजी सकाळी जळगावकडे रवाना करण्यात आली. सायंकाळी ते मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.गेल्या २६ वर्षांपासून रखडलेल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान योजनेत समावेश व्हावा, यासाठी अमळनेर तालुक्यातील शेतकरी ,विद्यार्थी , मजूर , कामगार यांनी ५२ हजार ५०० पत्रे लिहली. या पोस्टकार्डची गुरुवारी बैलगाडीवर मिरवणूक काढण्यात आली होती.
जनतेच्या भावना लक्षात घेत पोस्ट मास्तर आबासाहेब साळुंखे यांनी तातडीने कार्यालयातील सर्व १२ कर्मचाऱ्यांना कामाला लावत शिक्के मारले. सर्व कर्मचाऱ्यांनी विविध सात पाकिटात त्यांना सीलबंद केले. त्याचे वजन दीड क्विंटल भरले. सकाळी साडे सात वाजता सर्व पोस्टकार्ड जळगाव पोस्ट कार्यालयात रवाना करून मुंबई कार्यालयात संदेश पाठविण्यात आला.
माझ्या आतापर्यंत सेवेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्ड येण्याची पहिली वेळ आहे. - आबासाहेब साळुंखे , पोस्ट मास्तर अमळनेर.