लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे. जातीच्या पलीकडे जाऊन घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित येणे गरजेचे आहे. राजकीय आरक्षणाचा पलीकडे जाऊन आपल्या सर्वांना विचार करावा लागणार आहे. राजकारणात ओबीसी आरक्षण रद्द झाले तर महाराष्ट्रातून ५४ हजार ओबीसी असणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याचा फटका बसून त्यांच्यावर अन्याय होणार असल्याची भीती लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली.
पारोळा येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी २५ रोजी ओबीसीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण हक्क मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबत जनजागृतीसाठी पारोळा येथे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा विषय हा धगधगता आहे. त्याचा काय स्फोट होईल हे सांगता येणार नाही. हा राजकीय लढा नसून पुढच्या पिढीला त्यांचे न्याय व हक्काच्या आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सर्वानी एकत्रितपणे येऊन हा लढा लढवायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या प्रतिभा शिंदे, करीम सालार, संजय पवार, ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा परिषद सदस्य हिमत पाटील, मनोराज पाटील, संजय महाजन, महंमद मास्टर, सचिन धांडे, दौलत पाटील, रोहन मोरे, नितीन सोनार, डॉ. शांताराम पाटील, भरत कर्डीले, सुवर्णा पाटील, सुनीता शेंडे, कपिल चौधरी, बापू महाजन, बाळू पाटील, दीपक पाटील, मेहमूद पठाण यांच्यासह ओबीसी समाजाचे विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.