जळगाव : रविवारी जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरळीत सुरु झाली. जळगावहून मुंबईला ५५ प्रवासी गेले तर मुंबईहून जळगावला ३५ प्रवासी आल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. तर नियमित नाईट लॅडिंग संदर्भात ‘डीजीसीए’कडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हा मूर्तिकार संघटनेची बैठक उत्साहात
जळगाव : जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी अमळनेर येथील मूर्तिकारही उपस्थित होते. यावेळी शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणल्याने, हा निर्णय अन्यायकारक असल्याच्या भावना विक्रेत्यांनी या बैठकीत व्यक्त केल्या. तसेच राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारींबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
लग्नसराईनिमित्त बसेस फुल्ल
जळगाव : सध्या लग्नसराई जोरात सुरू असल्यामुळे महामंडळाच्या बसेसना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. विशेषत: नाशिक, धुळे, औरंगाबाद या मार्गावरील बसेसना प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळातर्फे या मार्गावर जादा बसेसही सोडण्यात येत आहेत.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी
जळगाव : शहरातील नेहरू चौकाकडून टॉवर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच वाहने पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मनपा प्रशासनाने या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी
जळगाव : शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये प्रचंड प्रमाणात कचरा साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी झाडांच्या शोभेवरही परिणाम होत आहे. मनपा प्रशासनाने दुभाजकांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.