जळगाव : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात ५५९ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. जामनेर तालुक्यात सर्वाधिक १०६ मुले शाळाबाह्य आढळली आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक ते दहा मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. यात ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शाळाबाह्य मोहिमेसाठी शालेय शिक्षण सोबत इतर विभागांनी सुद्धा हातभार लावला. १ ते १० मार्च या कालावधी मध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ग्रामीण भागातील बाजार, वीटभट्ट्या, मोठी बांधकामे आधी ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले गेले. यावेळी गुरुजींना जिल्ह्यात ५५९ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. सर्वाधिक शाळाबाह्य मुले ही जामनेर तालुक्यात आढळून आली आहे तर सर्वाधिक कमी शाळाबाह्य मुले आणि बोदवड तालुक्यात सापडून आली आहेत.
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुले
अमळनेर - १०, भडगाव -१४, भुसावळ - १९, बोदवड - ९, चाळीसगाव - ५४, चोपडा - ६८, धरणगाव - ४१, एरंडोल - १७, जळगाव ग्रामीण - ३७, जामनेर - १०६, मुक्ताईनगर - ८८, पाचोरा - २३, पारोळा - १८, रावेर - १७, यावल १५, जळगाव मनपा - २३.
२८७ मुले तर २७२ मुलींचा समावेश
जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलांमध्ये २८७ मुलांचा तर २७२ मुलींचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाने नोंद घेतली असून त्यांना लवकरच शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे.