संजय सोनवणे, चोपडा Maharashtra Election 2024: तालुक्यातील चुंचाळे येथील महाजन परिवारातील वेगवेगळ्या गावांत स्थिरावलेल्या ५८ मतदारांनी आपल्या मूळगावी एकत्र येऊन तेथील मतदान केंद्र क्रमांक ६५ मध्ये मतदान केले. चार भाऊ आणि प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य असा हा परिवार आहे.
महाजन परिवारात शिक्षक, इंजिनिअर, व्यावसायिक आहेत. यापैकी काही जण पुणे येथे वास्तव्याला आहेत. या सर्वांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावून आदर्श निर्माण केला आहे.
यासाठी शिक्षक जी. एस. महाजन, बी. जी. महाजन, वासुदेव महाजन, राजेंद्र महाजन, जितेंद्र महाजन, अक्षय महाजन, चुंचाळेचे पोलिस पाटील सुनील महाजन, तेजस महाजन यांनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे, परिवारातील चार नवमतदारांनी प्रथमच मतदान केले आहे. त्यासाठी ते पुण्याहून आले होते.
दोघांचेच मतदान
कजगाव (जि. जळगाव) : उमरखेड (ता. भडगाव) येथील मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २३५ पैकी फक्त दोनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरखेड हे गाव कजगावपासून दोन किमी अंतरावर आहे. या गावात दुपारी दीड वाजेपर्यंत फक्त एका वृद्ध मतदाराने तर दुपारी साडेतीन वाजता आणखी एका मतदाराने मतदान केले.
दोन सदस्यांचे १७ वेळा मतदान...
परिवारातील यमुना शहादू महाजन (८८) व अनसूया माधव महाजन (८८) या दोघींनी विधानसभेसाठी १७ वेळा मतदान केले आहे.