जळगाव - जळगाव लोकसभा मतदार संघासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५८ टक्के आणि रावेर मतदार संघात अंदाजे ६१ टक्के मतदान झाले. जळगाव मतदार संघात १४ आणि रावेरमध्ये १२ अशा २६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. यावर आता विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.जळगावमधून भाजपचे आमदार उन्मेष पाटील व राष्टÑवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात तर रावेरमधून भाजपच्या खासदार रक्षा खडसे व कॉंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील यांच्यात सरळ लढत होती.जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदार स्लीप वाटप न झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. तर दुसरीकडे मतदान केंद्रांबद्दल माहिती नसल्याने या गोंधळात चांगलीच भर पडली.जिल्ह्यात १८ ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. त्यामुळे जळगाव व रावेर मतदार संघात अनुक्रमे ७ व ५ ठिकाणी यंत्रांचे पूर्ण सेट बदलण्यात आले. तर सहा ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली.जळगावातील रामेश्वर कॉलनीत पैसे वाटप करताना जामनेर येथील भाजप कार्यकर्ता जितेंद्र वामनराव दलाल याला पकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.आचारसंहिता भंगाचे सात जणांविरुद्ध गुन्हेराजकीय पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी अमळनेरात सात जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात उन्मेष सोनार, पठाण काशीब खान ईस्माईल , चेतन मिस्त्री , नीलेश चौधरी , सागर बडगुजर , मोहित विजय सोनवणे आणि मुकेश रमेश पारधी यांचा समावेश आहे.चाळीसगाव, रावेर, मुक्ताईनगर आणि जळगाव येथे प्रत्येकी एकेक ठिकाणी सायंकाळी सहा वाजेनंतर मतदान सुरु होते. धरणगावसह तीन ठिकाणी मॉकपोलचे ५० मतदान डिलीट करण्यात आले नसल्याचे सायंकाळी लक्षात आले.मतदान यंत्रावर घेतलेला आक्षेप चुकीचा निघाल्याने भुसावळात अमोल रामदास सुरवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावसाठी ५८ तर रावेरला ६१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:58 PM