लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात प्रत्येक वर्षी आरटीई कायद्यान्वये खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये गरीब घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली होऊन पालकांना ३० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मंगळवारी मुदतीअंती ५ हजार ८३७ पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी ३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली होती. २१ मार्चपर्यंत अर्जाची मुदत दिली होती; परंतु पालकांना ओटीपी मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अर्ज करण्यास ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत होती. मुदतीअंती ५ हजार ८३७ पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले.
...अशा आहेत जागा
जळगाव जिल्ह्यात आरटीईअंतर्गत २९६ शाळांमध्ये ३ हजार ६५ राखीव जागा आहेत. या राखीव जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ५ हजार ८३७ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच मुदतवाढदेखील देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.