लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात १२ आमदारांच्या २४ कोटींच्या निधीपैकी आतापर्यंत सहा कोटी ८२ लाख ४३ हजार रुपयांच्या निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यंदा आतापर्यंत कमी निधी खर्च झालेला असला तरी येत्या काळात हा निधी पूर्ण खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे या वर्षी डिसेंबरपर्यंत कोणत्याही प्रशासकीय कामांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. जानेवारीपासून प्रशासकीय कामांना मंजुरी देण्यास सुरुवात झाली असली तर २० जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे आता जानेवारी अखेर आमदार निधीतून ४ कोटी ७ लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. गेल्या वर्षी शिल्लक असलेल्या कामांसाठी २ कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. असे ६ कोटी ४९ लाख ३८ हजार यावर्षी खर्च झाले आहेत. या खर्च झालेल्या निधीत कोविड १९ साठीच्या प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपये कोविडसाठी खर्च करता येणार होते.
शिल्लक निधीचे नियोजन
आमदारांच्या शिल्लक निधीतून कामे करण्यास पुरेसा वेळ आहे. मात्र त्या कामांना मार्च अखेर प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागणार आहे. बहुतेक कामे ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केली जातात. त्यामुळे या कामांची प्रशासकीय मंजुरी मार्च अखेर केली आणि त्याचा निधी कोषागारात आरक्षित केला तर ही कामे पूर्ण करण्यास स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तब्बल दोन वर्षांचा वेळ मिळतो. आमदार निधीतून सर्वाधिक कामे ही विविध समाजांसाठी सभागृहे उभारण्यावर केला जातो. सोबतच गावांमध्ये काँक्रिटीकरण करण्याकडे लक्ष दिले जाते. काही अनुदानित शाळांना पुस्तके आणि इतर मदत देखील दिली जाते.