'त्या' हल्ल्यास 6 महिने होऊनही अद्याप कारवाई नाही; एकनाथ खडसे हायकोर्टात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:45 PM2022-07-26T13:45:27+5:302022-07-26T13:46:15+5:30
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला एवढे दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंडच.
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेला आता 6 महिन्यांचा कालावधी झाला असून अद्यापही आरोपींवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे, याप्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपण जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच, गेल्याच आठवड्यात झालेल्या गोंधळातही तेच आरोपी होते, असेही खडसे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला एवढे दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंडच. त्यामुळे, राजकीय दबावमुळे ही चौकशी होत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. याविषयी आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे खडसे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर सहा महिन्यापूर्वी मुक्ताईनगर शहरातील गुंडांनी हल्ला केला होता. याचा तपास नाशिक आयुक्तांकडे देण्यात आला होता. मात्र, ते आयुक्त बदली झाल्याने आता दुसरे आयुक्त आले, तरीही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही. राजकीय दबावापोटी हे घडत आहे, त्याच प्रकरणातील गुन्हेगार परवाच्या मुक्ताईनगरच्या घटनेमध्ये होते. म्हणून आम्ही औरंगाबाद खंडपीठाकडे आता दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामध्ये एकनाथ खडसे समर्थकाला महिलांनी व शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्याचे पडसाद आज मुक्ताईनगर शहरांमध्ये दिवसभर दिसून आले होते. खडसे समर्थक आक्रमक होऊन मुक्ताईनगरच्या पोलीस स्टेशन आवारामध्ये ठिय्या मांडून बसले होते. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल न झाल्यामुळे खडसे समर्थक आक्रमक होऊन, तीव्र घोषणाबाजी करत होते. यावेळी, स्वत: रोहिणी खडसे याही हजर होत्या.