ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9- केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत ग्रीन स्पेस (हरित क्षेत्र अथवा उद्यान) विकसित करण्यासाठी 2016-17 या वर्षासाठीच्या दीड कोटीच्या निधीतून प्रस्तावीत सहा जागांवरील उद्यान व ग्रीनस्पेस विकसनाच्या प्रस्तावांना राज्य शासनाने गुरूवारी प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळर्पयत तातडीने याबाबत निविदा देखील प्रसिद्ध करावी लागणार आहे.
अमृत योजनेच्या सन 2016-17 या आर्थिक वर्षाच्या राज्य वार्षिक कृति आराखडय़ास केंद्र शासनाने मान्यता दिली असून यामध्ये जळगाव शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा (ग्रीन स्पेस) समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार मनपाने या दीड कोटीतून 5 जागांवर ग्रीनस्पेस (उद्यान) विकसित करणे व मेहरूण तलावाच्या काठाने हरितक्षेत्र (ग्रीनस्पेस) विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. शासनानेच नेमलेल्या लॅण्डस्केप डेव्हलपरने याबाबतचे नकाशेही तयार करून दिले होते. त्यांना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा जळगाव महानगरपालिका राहणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासन हिश्याचा निधी हा तीन टप्प्यात वितरीत केला जाणार आहे.
पुढील टप्प्यासाठीच्या जागांची निश्चिती
2017-18 या वर्षीसाठीही अमृत योजनेंतर्गत ग्रीनस्पेससाठी निधी मिळणार असून त्यासाठीही मनपाने तातडीने जागांचा प्रस्ताव देण्याची सूचना शासनाकडून करण्यात आलेली असल्याने या प्रस्तावासाठीही तातडीने जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या जागांचा समावेश
दीड कोटीच्या निधीतून निमखेडी गट नं.78, पिंप्राळा गट नं.28, पिंप्राळा रेल्वे गेट सव्र्हे नं.280, गणेशवाडी अंतिम भूखंड क्र.474, इंडिया गॅरेज मागील विवेकानंद उद्यान या ठिकाणी उद्यान विकसित करणे तर मेहरूण तलावाच्या काठाने हरितक्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. त्याची निविदा शुक्रवारी तातडीने प्रसिद्ध करावी लागणार आहे.