लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकेकाळी जळगावातील चटई उद्योग हा जगभरात प्रसिद्ध होता. त्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील होत होती. मात्र मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि सरत्या आर्थिक वर्षात या उद्योगाने मोठे नुकसान सोसले आहे. एप्रिल २० ते मार्च २१ या काळात चटई उद्योगाला जवळपास ६० टक्के म्हणजे १०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले एप्रिल ते जून या काळात सर्वच उद्योगदेखील बंद होते. जळगाव औद्योगिक वसाहतीतील सर्व चटई उद्योगांना या काळात कुलूप लागले होते. मात्र जुलैपासून परिस्थिती निवळायला लागली. तरीही गावी गेलेले कामगार लवकर न परतणे, तीन महिन्यांत झालेल्या नुकसानातून बाहेर येण्याची कसरत अशा अनेक अडचणींना या उद्योजकांना सामोरे जावे लागले.
अखेर नोव्हेंबर महिन्यात काहीशी आशा दिसू लागली. बहुतांशी उद्योग नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने चालले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यात जळगाव शहरातील या उद्योगांनादेखील मोठा फटका बसला आहे. कडक निर्बंधात उद्योग चालवणे अडचणीचे होऊन बसले आहे.
जळगाव औद्योगिक वसाहतीत असलेले बहुतेक उद्योग हे पुनर्वापरातून तयार झालेल्या प्लॅस्टिक कच्चा मालातून चटई तयार करतात. लॉकडाऊनच्या काळात किंवा नंतर वर्षभरात रिसायकलिंगसाठी प्लॅस्टिकच मिळत नव्हते. त्यामुळे कच्चा मालाची किंमत वाढली. वाढलेल्या किमतीमुळे चटईची किंमतदेखील वाढली मात्र त्या प्रमाणात त्याची विक्रीदेखील होत नव्हती.
जगभरात जाते जळगावची चटई
जळगावमध्ये तयार होणारी चटई ही जगभरात जाते. सध्या शहरात सर्वच प्रकारची चटई बनवणारे कारखाने आहेत. त्यात स्थानिक पातळीवर स्वस्त चटई विक्रीसाठी तयार केली जाते, तर उत्तम दर्जाची चटई युरोप, अमेरिका, मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये जाते. मात्र निर्यातीचा हा व्यवसायदेखील गेल्या काही महिन्यांमध्ये थंडावला आहे.
जळगाव शहरातील चटई उद्योग १५०
झालेले नुकसान १०० कोटी
झालेल्या नुकसानीची टक्केवारी (अंदाजित) ६० टक्के
कोट - जळगावातील चटई उद्योगाला गेल्या काही महिन्यांपासून घरघर लागली आहे. आम्हाला वर्षभरात फक्त तीनच महिने व्यवसाय करण्यास चांगल्या पद्धतीने मिळाले. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात ७० टक्के क्षमतेने कारखाने चालले. मात्र पुन्हा एकदा निर्बंध येत आहेत. वर्षभरात चटई उद्योगाला ६० टक्क्यांच्या वर नुकसान सोसावे लागले आहे.