रुग्णसंख्या घटतेय, मात्र मृत्यू थांबेना : जिल्ह्यात झाले एकूण ८८ मृत्यू , अन्य ठिकाणचा भार पुन्हा जीएमसीवर?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवडाभरात काेरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र असले, तरी नियमित होणारे मृत्यू मात्र थांबतच नसून, गेल्या आठवडाभरात जिल्हाभरात एकूण मृत्यूची संख्या ही ८८ आहे. यातील ६० मृत्यू हे जीएमसीत झाले असून, अन्यत्र २८ मृत्यूची नोंद आहे.
यात आठवडाभरातील तीन दिवस जिल्हाभरात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच मृत्यू झाले आहेत. या ठिकाणी ६० मृत्यू झाले असून ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांचा भार पुन्हा जीएमसीवर येतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, ती थांबलेली नसून, सर्वत्रच असे चित्र असल्याचे सांगितले जाते.
लाट ओसरत असताना मृत्युदर मात्र वाढला
एकत्रित जिल्ह्याची स्थिती बघता कोरोना हा अगदी पीकवर असतानाही मृत्युदर १.७८ किंवा १.७९ टक्के होता. मात्र, आता तो वाढून १.८० टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण कमी होत असले तरी होणारे मृत्यू हे त्या मानाने कमी होत नसल्याने हा मृत्युदर कमी होण्याऐवजी काही अंशांनी वाढला आहे. त्यामुळे यंत्रणेपुढे असे मृत्यू थांबविणे हे आव्हान कायम आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने गेल्या महिनाभरापूर्वी दिवसाला २० ते २४ मृत्यू होत होते, हेच प्रमाण आता ९ वर पोहोचले आहेत.
जीएमसीत झालेले मृत्यू
१६ मे १०
१७ मे १०
१८ मे ११
१९ मे ७
२० मे ०२
२१ मे ०२
२२ मे ०९
२३ मे ०७
२४ मे ०२
असा होता आठवडा
१७ मे रोजी जिल्ह्यात १० मृत्यूची नोंद होती, ते १० मृत्यू जीएमसीतच झालेले होते. यासह १८ व २२ मे रोजी जिल्ह्यातील सर्व मृत्यूची नोंद ही जीएमसीतच होती. कोरोनाची रुग्णसंख्या घटत असताना अन्य ठिकाणी रुग्णांची संख्या जीएमसीच्या मानाने कमी आहे. अधिक रुग्ण शिवाय गंभीर रुग्ण हे जीएमसीतच दाखल असल्याने या ठिकाणचे मृत्यू अन्य ठिकाणापेक्षा अधिकच असतील, असेही सांगितले जात आहे.
कोट
आलेख जसा जसा कमी होतो, तसे गंभीर रुग्णांचे जीएमसीत येण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे या ठिकाणी अधिक मृत्यू दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असून, सद्य:स्थितीत ४० टक्के बेड हे रिक्त आहेत. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता
कमी वयाचे मृत्यू घटले
मृत्यू थांबले नसले तरी ते कमी झाले आहेत. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे ५० वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. भुसावळ येथील एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू या आठवड्यात नोंदविण्यात आला आहे. मध्यंतरीच्या काळात ४० वर्षांखालील वयोगटांमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे एक भीतीदायक वातावरण होते. शिवाय या वयोगटातच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही त्यावेळी वाढलेले होते. मात्र, गेल्या आठवडाभराचे चित्र बघता या वयोगटाचे मृत्यू घटले आहेत, शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी आहे.