‘पीएफ’ नियमांचे परिणाम : शहर अभियंत्यांकडे केली मार्ग काढण्याची मागणी
जळगाव, दि.14- शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मक्ते घेणा:या मक्तेदारांना कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडणे बंधनकारक करण्यासोबतच आता 14 टक्के सेवाकरही लागू केला असल्याने मनपातील विविध विभागांची कामे करणारे सुमारे 60 मक्तेदार अडचणीत आले आहेत. त्यांना सेवाकर, पीएफ त्यासोबतच 7 टक्के इतर कर भरावे लागत असल्याने मक्तेदारांचे नफ्याचे ‘मार्जीन’ घटल्याने ते काम बंद करण्याच्या मनस्थितीत असून असे झाल्यास मनपाच्या सफाई, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मक्तेदारांनी गुरूवारी याबाबत शहर अभियंत्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली.
या मक्तेदारांनी शहर अभियंता दिलीप थोरात यांची भेट घेऊन ही व्यथा मांडली. तसेच मक्ता दिला तेव्हा या अटी नव्हत्या. त्यामुळे मनपाने मक्त्याच्या रक्कमेत वाढ करून देण्याची मागणीही केली. शहर अभियंता यांनी आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.