१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?
दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकाला नोटीस बजावण्यात येते. मात्र त्यापलीकडे महापालिका प्रशासनाकडून इतर कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती असून, यामध्ये तब्बल ६००हून अधिक नागरिक राहत आहेत. पावसाळ्यात दुर्दैवाने काही घटना घडल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
या इमारतींमध्ये राहण्याची इच्छा येथील रहिवाशांची नसली तरी पर्याय नसल्याने या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची खंत या इमारतीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच या ठिकाणी एक-एक रात्र काढावी लागते. मरण्याची हौस नसली तरी पर्याय नसल्यामुळे याठिकाणी दिवस काढावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मनपाकडून दरवर्षी नोटिसांचा सोपस्कार पार पाडला जातो, घरमालकांना इशारे दिले जातात, मात्र कारवाई कोणतीही होत नाही. घरमालक इमारतींची दुरुस्तीदेखील करत नाहीत अन् मनपा प्रशासनाकडून त्या घरमालकांवर कोणतीही कारवाईदेखील केली जात नाही. या परिस्थितीमुळे मात्र या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा पावसाळ्यातील प्रत्येक रात्र जीव मुठीत घेऊन काढावी लागत असते. जळगाव शहरात इमारत कोसळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सारे कळते मात्र कुठे जाणार?
आम्ही राहत असलेली इमारत धोकेदायक असली तरी इतर कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर किरकोळ दुरुस्ती करून या इमारतींमध्ये दिवस काढावे लागत आहे.
- रघुनाथ सोनवणे, रहिवासी
इमारत धोकेदायक असल्याने या ठिकाणी पावसाळ्यातील कमीत कमी दिवस राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच दरवर्षी किरकोळ दुरुस्ती करून, पावसाळ्याच्या हंगाम संपण्याची वाट पाहत असतो.
-कमलबाई माळी, रहिवासी
जळगाव शहरात घरभाडे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. महागाईच्या काळात मिळेल त्या घरात काही काळ वास्तव्य करावे लागले तरी, ते काढण्याचे प्रयत्न असतात. इमारत कोसळण्याची भीती तर असतेच, मात्र पर्याय तरी आमच्याकडे काय आहेत.
- लादू सुरवाडे, रहिवासी
वारंवार दिल्या नोटिसा
पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकांना नोटिसा दिल्या जातात. त्यांना घर सोडण्याची किंवा घराची दुरुस्ती करण्यासंदर्भात सांगितले जात असते. मात्र दरवर्षी अनेक घरमालक इमारतीची किरकोळ दुरुस्ती करून वेळ मारून नेतात, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती आहेत.
इमारत पडल्यास जबाबदार कोण?
शहरातील धोकेदायक इमारतींमध्ये बहुतांश रहिवासी हे भाडेधारक आहेत. मनपा प्रशासनाकडून या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची जबाबदारी पार पाडली जाते तर इमारत मालकदेखील किरकोळ दुरुस्ती करून, याकडे दुर्लक्ष करत असतात. पावसाळ्यात शहरातील एखादी इमारत कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अत्यंत धोकादायक इमारती या तोडण्याची गरज आहे.