शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार : डीपीडीसीतून मनपाला मिळाला आतापर्यंतचा सर्वाधिक निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट होत असून, मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असताना, महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. यातून शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेला जिल्हा नियोजन विभागाकडून आतापर्यंतच्या इतिहासात मिळालेला हा सर्वाधिक निधी असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
महापालिकेत गेल्या महिन्यात भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेची सत्ता आली आहे. महिनाभराच्या आतच महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल ६१ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने, हा नवनियुक्त महापौर जयश्री महाजन यांचा पायगुणच ठरला असल्याची ही भावना शिवसेना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृह येथे या निधीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे आदी उपस्थित होते.
विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातही कामे होणार : पालकमंत्री
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जळगाव शहराच्या विकासासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला असून, पंधरा दिवसांच्या आत निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू करण्यावर भर राहणार असल्याचीही माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या निधीतून केवळ शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणार नसून, विरोधी पक्ष असलेल्या भाजप नगरसेवकांच्या प्रभागातदेखील कामे केली जातील, अशीही माहिती पालकमंत्र्यांनी दिली. बदल्यांचे राजकारण आम्ही करत नसून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
रस्त्यांसह सर्वसमावेशक कामे घेणार
शहरात आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही महिन्यात हे काम पूर्ण होणार असून, या योजनेमुळे थांबलेली रस्त्यांची कामे आता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निधीतून शहरातील रस्त्यासह सर्वसमावेशक कामे करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यासह नगरोत्थानअंतर्गत महापालिकेला जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठावी, याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, हा निधी प्राप्त झाल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जातील, अशीही माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
कोट..
शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेला जिल्हा नियोजन समितीमार्फत ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
- जयश्री महाजन, महापौर
अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळालेल्या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे नागरिकांची अनेक वर्षांपासून होत असलेली गैरसोय आता टळणार आहे.
- कुलभूषण पाटील, उपमहापौर
३१ मार्चअगोदरच प्रस्ताव तयार करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले होते. पालकमंत्र्यांनीदेखील शहराच्या विकासासाठी तत्काळ निधी मंजूर करून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शहराचे प्रश्न आता सोडवता येणार आहेत. यासह राज्य शासनाकडे स्थगित असलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
-नितीन लढ्ढा, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना