डमी - स्टार - ८५८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी आतापर्यंत ६३ हजार ५६० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी ४ हजार ७१७ विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच्या लॉगिनला पडून आहेत. प्रलंबित अर्जांची पडताळणी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. ही मुदत वाढवून ३० जून करण्यात आली होती.
एससी प्रवर्ग
किती अर्ज ऑनलाइन सादर केले - १०,०८८
समाज कल्याण विभागाने निकाली काढले -७,६४२
महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या - ६९७
व्हीजेएनटी प्रवर्ग
किती अर्ज ऑनलाइन सादर केले - ५३,४७२
समाज कल्याण विभागाने निकाली काढले - ४०,१९०
महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या - ४,०२०
कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातच शिक्षण ऑनलाइन असून त्यात विविध डेटा पॅकची भर पालकांच्या माथी पडली आहे. असे असून देखील महाविद्यालयांकडून संपूर्ण फी वसूल केली जात आहे. त्यातच विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती मात्र अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुध्दा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-रितेश महाजन, विद्यार्थी,
ज्या विद्यार्थ्यांनी आधी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहे. त्यांच्या अर्जांना तात्काळ मंजूरी देण्यात यावी. विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील शिष्यवृत्तीची रक्कम सुध्दा अजून मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात यावी.
- विकास मोरे, विद्यार्थी,
लवकर मिळणार शिष्यवृत्ती
एकूण ६३ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ९७५ विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. लवकरच ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. दरम्यान, अर्जासाठी पुन्हा मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे अर्ज करता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होवू शकते.