लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा आलेख घसरत असून होम आयसोलेशनमध्येच बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असून घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या या आठवडाभरात ६५२ ने घटली आहे. सुरूवातीला होम आयसोलेशनच्या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र समोर आल्यानंतर याचे निकष आता कडक करण्यात आले आहे. या रुग्णांवर प्रशासनाची कडक नजर असल्याचा दावा केला जात आहे.
एक रुग्ण चक्क बाहेर
गेल्या काही दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमधील एक रुग्ण बाहेर फिरत असल्याचे बहिणाबाई उद्यानाजवळ झालेल्या तपासणीत समोर आले होते. विना वाहन हा रुग्ण फिरत असल्याने त्यातून अनेकांना बाधा झाल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर त्या रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
असे घटले रुग्ण
१ मे ६९३५
२ मे ६८३३
३ मे ६६१९
४ मे ६२७१
५ मे ६२७१
६ मे ६१६३
७ मे ६२८३
निकष काय सांगतात
ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत त्यांंना होम आयसोलेशनची परवानगी दिली जाते, यासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र स्वच्छतागृह, घरात काळजी घेणारी व्यक्ती हवी, वय ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे, अन्य व्याधी नसाव्यात. असे काही निकष असून आता आधी रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. नंतर नातेवाईकांना पुढील प्रशासकीय प्रक्रिया करावी लागते, त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात येते. अर्जही आता कोविड केअर सेंटरलाच प्राप्त होत असतो.
काय काळजी घ्यावी
स्वतंत्र रूममध्ये राहावे, १४ दिवस कुटुंबातील अन्य सदस्यांच्या वेगळे रहावे, आहार चांगला असावा, संत्री, मोसंबी या फळांचे सेवन करावे, कैरीचे पन्हे घ्यावे, व्हिटॅमिनयुक्त आहार घ्यावा, दर चार तासांनी ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी मोजावी, ती ९५ च्या खाली आली असेल तर डॉक्टरांशी संपर्क करावा. असे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.