लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर भारती सोनवणे यांनी १८ फेब्रुवारी रोजी नगरसचिवांना पत्र देत शहरातील ९८ रस्त्यांची कामे करण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यास सांगितले आहे. त्यात त्यांनी शहरातील ९८ रस्त्यांसाठी ६८ कोटी २१ लाख रुपयांचे खर्च देखील नमूद केले आहे. मात्र ही कामे पूर्ण कशी होणार, असा सवाल नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे.
महापौरांनी नगरसचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावर्षी असलेल्या बजेट तरतुदीनुसार ७० कोटी रकमेची तरतूद नवीन रस्त्यांसाठी केली आहे. त्या अनुषंगाने अमृत योजनेचे काम पूर्णत्वाच्या जवळपास असल्याने यादीतील सुधारित विकासकामे करण्यास व येणाऱ्या खर्चाला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या पटलावर घेण्यात यावा. रस्त्यांची दुरुस्ती डांबरीकरण यासोबतच प्रभाग क्रमांक १२ मधील रामदास कॉलनी ओपन स्पेसमध्ये बगिचा विकसित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
आर्थिक स्थिती हलाखीची, मग कामे कशी?
शहरात मनपा फंडातून ६८ कोटींच्या कामाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र हे काम होणार कसे, असा सवाल नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. या आधी आपण प्रभाग क्रमांक १५ मध्ये लक्ष्मी नगरात शौचालयापर्यंत जाणारा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव नेला होता. त्यावर आयुक्तांनी मनपाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने हे काम शक्य नसल्याचे सांगितले होते, असा दावाही नाईक यांनी केला.