जळगाव : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या नेहरु नगरात हेमंत सुभाष भंगाळे यांच्या बंद घराचे कुलुप व कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व १८ हजाराचे दागिने असा ६८ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेंमत भंगाळे हे आरटीओ कार्यालयाजवळ पावभाजी व चायनिज खाद्य पदार्थाचा व्यवसाय करतात. वडील सुभाष लक्ष्मण भंगाळे, आई अलका,पत्नी वैष्णवी व मुलगा असे ते परिवारासह नेहरु नगरात दत्त मंदिराजवळ वास्तव्याला आहेत. नेहरु नगरात कोराना बाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला होता. १२ जून रोजी हा भाग खुला झाला. त्यामुळे त्याच दिवशी पत्नी व मुलासह हेमंत हे नेरी, ता.जामनेर या मुळ गावी गेले तर आई, वडील आधीच गेलेले होते. बॅँकेच्या कामकाजासाठी पत्नीचे काही कागदपत्रे लागणार असल्याने हेमंत हे बुधवारी दुपारी घरी आले. लोखंडी गेटचा दरवाजा उघडून आत गेले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तुटलेला होता तर घरातील बेडरुम व इतर खोल्यांमधील कपाट उघडे होते तसेच साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील ४० हजाराची रोख रक्कम व १८ हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या चोरी झाल्याचे समजले. आईच्या कपाटातील दागिने व रोख रक्कम देखील गायब झाली असून ती नेमकी किती हे आई घरी आल्यावरच स्पष्ट होईल. हा प्रकार उघड झाल्यानंतर हेमंत भंगाळे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार रामकृष्ण पाटील करीत आहे.
जळगावात कंटेनमेंट झोनमध्ये ६८ हजाराची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 8:34 PM