किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील सावदा शहरात ७, रावेर, मस्कावदसीम व निंभोरासीम येथील प्रत्येकी एक असे १० रूग्ण कोरोनाने बाधित झाले असून, त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा मृत्यूदर तालुक्यात ७० टक्के झाला आहे.निंभोरासीम येथील एका मयत प्रौढाचा कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वी परिवार व आप्तेष्टांनी पारंपरिक पद्धतीने दि २४ मे रोजी अंत्यसंस्कार केल्याने ६१ जणांना विलगीकरण करून ९ जास्त धोक्याच्या संपर्कातील संशयितांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्या अनुषंगाने निंभोरासीम ग्रा.पं.च्या ग्रामसेवकांनी फिर्याद दिली. निंभोरा पोलिसात मयताच्या परिवारातील व आप्तेष्टांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा तथा साथरोग प्रतिबंधक अधिनियमांचे व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३५ १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावदा शहरातील ७ पैकी केवळ एकाच रूग्णाचा स्वॅब नमुना कोविड केअर सेंटरद्वारे रवाना झाला असून, तो चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तथापि, उर्वरित सहा जणांनी खासगी रुग्णालयात औषधोपचार घेऊन जळगावच्या जिल्हा कोरोना रूग्णालयात वा परस्पर जिल्हा कोरोना रूग्णालयात जावून दाखल झाल्याची पार्श्वभूमी आहे. तथापि, लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्याचा परिणाम सावदा शहरात जाणवत असून, सात जण बाधित झाले. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने थोरगव्हाण जि. प. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथील रहिवासी असलेले २७ वर्षीय डॉक्टर व एका खासगी रुग्णालयातील मस्कावदसीम येथील कंपाऊंडर कोरोना बाधित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, या सात कोरोना बाधित रूग्णांपैकी ६५ ते ७० वर्षे वयोगटावरील पाच कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला असून, ६५ ते ७० वर्षे वयोगटातील दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. अपवादात्मक ४४ वर्षीय वयोगटातील एका इसमाचा समावेश आहे.दरम्यान, रावेर येथील कोरोना बाधित भाजीपाला आडत दिवाणाचा मृत्यू ६० वर्षे वयोगटातील असून, निंभोरासीम येथील कोरोना बाधित मयताचे वय ५२ वर्षे आहे.एकंदरीत, तालुक्यातील कोरोना बाधित मयतांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खालावलेल्या सातपैकी सहा वयोवृद्धांचा समावेश आहे. परिणामी कोरोना बाधित मृत्यूदर ७० टक्केवर जावून पोहचला आहे.रावेर शहरातील भगवती नगर, सावदा शहरातील गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शारदा नगर, गवत बाजार, पोलीस स्टेशन नाका, निंभोरासीम येथील विटवा रस्त्यावरील दर्शनी भाग तर मस्कावदसीम येथील १०० मीटर परिघातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. स्वयंसेवकांद्वारे त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवली जात आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही फेरबदल नसून, त्या क्षेत्रात कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. रावेर शहरातील भगवती नगरमधील संपर्कातील १५ लोकांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत घराबाहेर पडून त्या क्षेत्रात वावर सुरू केला आहे.
रावेर तालुक्यात दहापैकी ७ कोरोना बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 7:26 PM
रावेर तालुक्यातील दहापैकी सात कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्दे६ वयोवृध्द व्यक्तींवर कोरोनाने घातली झडपरावेर तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर ७० टक्केनिंभोरासीम येथे पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल