जळगाव - मुलाला दवाखान्यात नेत असताना झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चाळीसगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर दक्षिणेला राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ वर रांजणगाव फाट्याच्या पुढे आयशर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. मागील बाजूनं येणारे दोघे बाईकस्वारांचाही या दुहेरी अपघातात मृत्यू झाला आहे. सोमवारी उशीरा रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सातही मृत एकाच कुंटुबातील असून शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील बोढरे येथील रहिवासी होते.
मितेश नामदेव चव्हाण (वय १७ ) याची प्रकृती बरी नसल्याने त्याची आई शिलाबाई नामदेव चव्हाण यांच्यासह मिथून रुमदेव चव्हाण (वय २५), शुभम तुकाराम चव्हाण (वय१७), गाडी चालक पंडीत बापू जाधव (वय ५५) हे सर्व गाडीनं चाळीसगावकडे येत असताना रांजगाव फाट्याच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ येथे धुळेहुन औरंगाबादकडे जाणारा ट्रक एम.एच. १८ बीए ९९९० यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. याचवेळी मितेशचे वडील नामदेव नरसिंग चव्हाण (वय४२) व त्यांचा पुतण्या राजेंद्र गलसिंग चव्हाण (वय ४२ ) हे मोटार सायकल क्र. एम.एच. २० एके २८०५ ने गाडीच्या मागेच येत होते. यावेळी ट्रकची त्यांनाही धडक बसली. दुहेरी अपघातात हे सर्व एकाच कुटुंबातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेली मिनाबाई रुमदेव चव्हाण (वय ४५ ) ही अत्यवस्थ असून तिला धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयुर नामदेव चव्हाण (वय १५) याच्यावर चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेविषयी कळताच माजी आमदारा राजीव देशमुख, माजी जि.प. सदस्य राजेंद्र वाडीलाल राठोड, प्रमोद पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, जगदीश चौधरी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयात पहाटेच धाव घेतली. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. दरम्यान बोढरे गावात शोककळा पसरली आहे.