जळगाव : आयडीबीआय आणि इतर दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँकांचा १५ व १६ मार्च असे दोन दिवस संप पुकारण्यात आला असून यामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या अंतर्गत असलेल्या एकूण नऊ संघटना सहभागी होणार आहेत. कोरोना संसर्गामुळे यावेळी निदर्शने, धरणे, मेळावे होणार नसून संघटनांच्या वतीने केवळ कामबंद ठेवले जाणार आहे. या संपामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के व्यवसाय ठप्प होणार आहे.
संपात जिल्ह्यातील अंदाजे एक हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होणार असून जवळपास १ लाख कोटींचा व्यवसाय ठप्प होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक सर्व श्रेणीतील अधिकारी या संपात सहभागी होत असल्यामुळे संप १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने व्यक्त केला जात आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्पलॉइज फेदरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना संपात सहभागी होणार आहेत.