लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात १५ फेब्रुवारीपासून होणाऱ्या मृत्यूच्या संख्येपैकी ७५ टक्के मृत्यू हे रुग्णाला दाखल केल्यापासूनच्या ७२ तासांच्या आत होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले जाणारे कोरोना रुग्ण हे अतिगंभीर किंवा गंभीर स्वरूपाचे असतानाच जास्त प्रमाणात दाखल केले जातात. त्यामुळे या महाविद्यालयातील मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी ३४६ रुग्ण दाखल होते. त्यापैकी सर्वच रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आले आहेत. त्यातही बेड रिकामा झाला की लगेच त्याला दुसरा रुग्ण बेडसाठी रांगेत असतो. त्यामुळे उपचार कसे करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ फेब्रुवारीपासून वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत ७६ कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील ७५ टक्के रुग्णांचा मृत्यू हा दाखल केल्यापासून ७२ तासांच्या आत झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू २४ ते ७२ तासात
रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वाधिक मृत्यू हे २४ ते ७२ तासांत होत आहे. रुग्णाला दाखल केल्यावर त्याच्या आजाराची गंभीरता लक्षात घेऊन त्यावर उपचार केले जातात. मात्र उपचारांना आधीच उशीर झाला असेल तर रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे दाखल केल्यावर एक दिवस उलटला की नंतर तीन दिवसांपर्यंत धोका कायम असतो. त्याच काळात सर्वाधिक ३२ मृत्यू झाले आहेत.
कोट-
यात सर्वाधिक मृत्यू हे २४ ते ७२ तासांच्या आत झाले आहेत. कोरोना पहिल्या काही दिवसांत फक्त लक्षणे दाखवतो. त्यात नवे समोर आलेले लक्षण म्हणजे डायरिया आहे. त्यात रुग्णाने जर त्याकडे वेळी लक्ष दिले नाही तर कोरोनाचे विषाणू फुफ्फुसावर हल्ला चढवतात. त्यानंतर बहुतांश रुग्ण हे रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. ते रोखण्यासाठी रुग्णांनी वेळेवरच औषधोपचार केले तर त्याचा फायदा रुग्णांनाच होईल. पहिल्या दोन दिवसांमध्ये औषधोपचार योग्य पद्धतीने केले तर रुग्णाला निश्चितच फायदा होईल.
- डॉ.जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आकडेवारी (दाखल केल्यापासून)
१५ फेब्रुवारी ते २९ मार्च
एकूण मृत्यू ७६
पहिल्या सहा तासात - ८
सहा ते २४ तासांत - १५
२४ ते ७२ तासांत - ३२
७२ तासांच्या पुढे - २१