जळगाव : खान्देशातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ७५० च्यावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमुळे महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. मागील वर्षी नोकरभरतीला स्थगिती देण्यात आल्यामुळे प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांच्या रोजगारावर आधीच कुऱ्हाड कोसळली आहे. आता तरी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी प्राध्यापक भरतीचा मुहूर्त काढावा, अशी मागणी होत आहे.
प्राध्यापकांच्या हजारो जागा महाविद्यालये व विद्यापीठात रिक्त असल्यामुळे काही वर्षांपूर्वी राज्यात प्राध्यापक भरती व्हावी म्हणून काही नेट, सेट पात्रताधारकांकडून आंदोलन-उपोषणे केली गेली होती. त्यानंतर महापदभरती घेण्यात येणार असे सांगण्यात आले होते़ पदभरतीला सुरुवातही झाली. पण, कोरोनाचे संकट आल्यानंतर कुठलीही नवीन नोकर भरती होणार नाही असे शासनाचे पत्र मे २०२० मध्ये धडकले. नंतर कुठलेही शासनाचे पत्र न आल्यामुळे अद्याप ही स्थगिती कायम असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ८३ अनुदानित महाविद्यालये आहे़ सध्या चार हजाराच्यावर प्राध्यापक कार्यरत आहेत. पण, अजूनही ७५० च्यावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. भरतीबाबत उच्च शिक्षण विभागाकडून कुठल्याही हालचाली नसल्यामुळे विद्यार्थी इतर क्षेत्राकडे वळत आहेत. परंतु, काही विद्यार्थी अजूनही भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.
५७ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य
खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांमधील ५७ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य कार्यरत आहेत़ दरम्यान, २६ महाविद्यालयांमध्ये अजूनही प्राचार्य पदाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयात प्रभारी राज सुरू आहे. परिणामी, रिक्त जागांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सन २०१८-१९ मध्ये काही प्रमाणात प्राध्यापकांच्या जागा संस्थास्तरावर भरण्यात आल्या होत्या. त्यानंतर लोकसभा, विधानसभेच्या आंचारसंहिता, कोरोना यासह विविध कारणांनी महापदभरतीला अडथळे निर्माण होत होते. शेवटी स्थगिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
घ्यावे लागते नाहरकत प्रमाणपत्र
महाविद्यालयांना पदभरती करण्याआधी नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. नंतर विद्यापीठाकडून जाहिरात प्रसिध्द होते़ शेवटी महाविद्यालयात मुलाखत घेऊन भरती केली जाते. पण, सध्या प्राध्यापक भरतीला कोरोनाचे कारण देऊन खो देण्यात आला असल्यामुळे ही पदभरती कधी होणार, असा प्रश्न आता नेट, सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून होत आहे.