ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.6- धार्मिक, सामाजिक क्षेत्रात देशहिताचे विविध उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नि:स्वार्थीपणे राबविले जातात. प्रतिष्ठानचे सर्वच सदस्य अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणाने समाज कार्य यशस्वीपणे पार पाडत असतात, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यासारखे देशहिताचे उपक्रम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी कोणाचीही मदत न घेता राज्यभर राबविले. त्यांचे सर्वच उपक्रम स्तुत्य असल्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. या प्रतिष्ठानतर्फे जामनेरसह तीन तालुक्यात 75 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
तालुक्यातील टाकळी गावाजवळ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे गेल्या वर्षी एक हजार वृक्ष लागवड करण्यात आली होती. या वृक्षांचे संवर्धन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. या संवर्धनाची पाहणी करण्यासाठी मंत्री महाजन यांनी येथे भेट दिली असता, ते बोलत होते. प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी 850 वृक्षांचे संवर्धन होऊन जगविण्यात आले. उर्वरित 150 नवीन वृक्षांची लागवड महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
टाकळी ग्रामपंचायतीने वृक्ष संवर्धनासाठी पाण्याची व्यवस्था गेल्या वर्षभरापासून उपलब्ध करून दिली आहे. या वेळी नगराध्यक्ष साधना महाजन, जे. के.चव्हाण, रजनी चव्हाण, नवल पाटील, चंद्रकांत बाविस्कर, हेमंत वाणी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड योजनेत शासन, लोकसहभाग व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा समावेश आहे. आज जामनेर, जळगाव व एरंडोलमध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पाच हजार सदस्यांनी वनविभागाच्या हद्दीत 75 हजार वृक्ष लागवड केली.