कुंदन पाटील/ जळगाव : वाळूमाफियांना ठेचण्यासाठी यापुढे तापी आणि गिरणा नदीकाठच्या डझनभर ‘हॉट स्पॉट’वर राज्य सुरक्षा महामंडळाचे सशस्त्रधारी ७८ जवान तैनात करण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव महसुल प्रशासनाने राज्य सुरक्षा महामंडळाला दिला आहे. त्यानुसार बुधवारी महामंडळाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून संक्रांतीनंतर ‘हॉट स्पॉट’ठरलेल्या वाळू घाटांवर जवान तैनात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कुणबी-मराठा सर्व्हेक्षण, लोकसभा निवडणुक आणि दैनंदिन कामकाजामुळे मोकळ रान मिळणार, या भ्रमात असलेल्या वाळूमाफियांना यंदाची संक्रांत चांगलीच त्रासदायक ठरणार आहे. कारण दि.१५ जानेवारीनंतर आगामी अडिच महिन्यांच्या कालावधीसाठी १२ वाळूघाटांवर राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
आज आढावा घेणारदरम्यान, यापूर्वी राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या वाळूघाटांची पाहणी केली आहे. जवान तैनात केल्यानंतर कारवाईची दिशा आणि माफियांना लगाम घालण्यासाठी आवश्यक ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी राज्य सुरक्षा महामंडळाचे अधिकारी बुधवारी मुंबईहून जळगावात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब होणार आहे. जवानांच्या मानधनापोटी जिल्हा प्रशासनाकरवी त्यांना आगाऊ रकम अदा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.