लोकमत न्यूज
जळगाव : कोरोनाच्या वाढीत जळगाव शहर आणि चाळीसगाव ही दोन ठिकाणे हॉटस्पॉट ठरली असून मंगळवारी जिल्ह्यातील एकूण ३६८ रुग्णांपैकी १६४ रुग्ण अर्थात ४४ टक्के रुग्ण एकट्या जळगाव शहरात आढळून आली आहेत. त्यामुळे शहरात अधिक काळजी घेण्यासाठी प्रशासनाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. मात्र, कोरोना वाढत असला तरी प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली सुरूच असल्याचे गंभीर चित्र शहरात आहे.
जळगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग वाढला आहे. मंगळवारी काही गावांमध्ये ३४ रुग्ण आढळून आले आहे. आरोग्य यंत्रणेकडून जळगाव ग्रामीणमध्ये तपासण्या घटल्याचे चित्र होते. मात्र, तपासण्या वाढल्यानंतर बाधितांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यातील काही विशिष्ट भागांमध्ये सातत्याने रुग्ण समोर येत आहेत. त्या जळगाव शहर व चाळीसगाव आघाडीवर असताना अचानक मंगळवारी जळगाव ग्रामीणमध्येही रुग्णवाढ समोर आली आहे. दरम्यान, भुसावळ व चोपडा तालुक्यातील ७० व ७३ वर्षीय पुरूषाच्या मृत्यूची नोंद आहे. मृतांची संख्या १३७७ वर पोहोचली आहे.
एका दिवसात ११८ रुग्ण
जिल्ह्यात लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये २४ तासात ११८ ने वाढ नोंदविण्यात आली आहे. सोमवारी एकत्रित रुग्णांपैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही असलेल्या रुग्णांची संख्या ही ३७२ होती ती मंगळवारी ४९० नोंदविण्यात आली आहे.
हॉटस्पॉट
जळगाव शहर : १६४
चाळीसगाव : ५५
जळगाव ग्रामीण : ३४
चोपडा : २८
यामुळे चिंता
प्रलंबित अहवाल : १४५०
ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण : ९४ रुग्ण
अतिदक्षता विभागात दाखल : ५२ रुग्ण
शहरात दोनच दिवसात : ३२२ रुग्ण
दोन दिवसातील मृत्यू : ०६
प्रलंबित अहवालांबरोबर चिंताही वाढली
एका दिवसात २५०० चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, स्थानिक तपासणी प्रयोगशाळेची क्षमता ही ८०० पर्यंत असल्याने रोजच्या प्रलंबित अहवालांची संख्या वाढतच आहे. मध्यंतरी पॉझिटिव्हीटी पाच टक्क्यांपर्यंत असल्याने पुल्ड टेस्टींगचा प्रयोग राबवून क्षमता वाढविण्यात आली होती. मात्र, पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांवर गेल्याने आता नियमीत तपासणी होत आहे. त्यामुळे या लॅबवर भार वाढल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था न केल्यास अहवालांना विलंब होणे हे अधिक धोकादायक ठरू शकते, असाही सूर उमटत आहे.
'स्ट्रेन'ची आठवडाभरात तपासणी
जिल्ह्यात रुग्णवाढू लागल्याने यात हा नवीन कोरोना विषाणू आहे का? याच्या तपासणीसाठी या आठवडाभरात एका दिवशी एकत्रित अहवालांच्या सहा टक्के अहवाल हे पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
सद्यस्थितीत अमरावती व यवतमाळ येथील स्ट्रेन कोरोना तपासणीला एनआयव्ही येथे प्राधान्य दिले जात असून त्यानंतर टप्प्या टप्याने अन्य ठिकाणच्या अहवालांची तपासणी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे पत्र प्राशसनाला प्राप्त झाले असून एकूण अहवालांच्या सहा टक्के अहवाल हे एनआयव्हीला पाठविण्यात येणार आहे. आठवड्यातून एकाच दिवशी हे अहवाल पाठविण्यात येणार आहे.