चाळीसगाव, जि.जळगाव : नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे.माणिकपुंज मध्यम प्रकल्प हा तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावाजवळ गिरणा नदीची उपनदी असलेल्या मन्याड नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे, करंजगाव, तांबोळे, चितेगाव, हातगाव, रोहिणी, शिंदी, ओठरे अशा आठ गावांना ६८५ हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. माणिकपुंज मध्यम प्रकल्पावर प्रथम नांदगाव तालुक्याचा हक्क असला तरी चाळीसगाव तालुक्यातील ही आठ गावे पर्जन्यछायेतील आहेत. येथे पावसाचे प्रमाण कमी असून, दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावे.चाळीसगाव तालुक्यात अतिरिक्त पाणी देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन नांदगाव तालुक्यातील राजकीय मंडळींनी दिलेले आहे. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ तसेच दूरदूरदृष्टीचा अभाव आहे. भारतीय नद्यांच्या पाणी वाटप धोरणाचा अभ्यास नसल्याने त्यांनी विरोध दर्शविला आहे. परंतु मानवी दृष्टिकोनातून चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त, पर्जन्यछायेच्या अवकृपा असलेल्या प्रदेशाला अतिरिक्त पाणी माणिकपुंज मध्यम प्रकल्पातून देण्यात यावे. या संदर्भात आपण मानवी हित, शेती, पिण्याचे पाणी, तसेच पशुपक्ष्यांचादेखील विचार करून पाणी वाटप करावे अन्यथा चाळीसगाव तालुक्यातील आठ गावातील लोकांची जनआंदोलनामार्फत धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, करण्याच्या तयारीत आहेतच. या लोकांचा असंतोष वाढू नये असे वाटते, असे निवेदनात म्हटले आहे.या आशयाच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्य सचिव मंत्रालय, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनावर प्रा.गौतम निकम, विजय शर्मा, आब्बा गुजर, योगेश्वर राठोड, विजय चौधरी, नाशीरभाई शेख, महेश चव्हाण यांच्या सह्या आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना माणिककुंज धरणाचे पाणी मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:24 PM
नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे.
ठळक मुद्देजनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे धावपावसाचे प्रमाण कमी असून, दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावेभारतीय नद्यांच्या पाणी वाटप धोरणाचा अभ्यास नसल्याने राजकीय मंडळींकडून विरोध